दोघांकडून एक लाखांची ई-तिकीटे जप्त, मध्य रेल्वे पथकाची कारवाई

सणासुदीच्या काळात मुंबईकर चाकरमान्यांची मोठ्या संख्येने गावी जात असतात. त्यामुळे मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दीही तितकीच असते. याचाच फायदा घेत अनेक जण तिकिटं दुप्पट भावात विकतात. अशाच प्रकारे तिकिटांचा काळाबाजार करत असलेल्या एका जोडीला अटक करण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे.

दोघांना चेंबूरमधून अटक

‘निओ’ नावाच्या संगणकीय सॉफ्टवेअरच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या पर्सनल आयडीचा वापर करून ई-तिकीट काढणाऱ्या दोघांना चेंबूरमधून अटक करण्यात आली आहे.

संदीप शर्मा आणि शिवकुमार गुप्ता अशी या दोघांची नावं आहेत. कारवाईत पथकाने 1 लाख 15 हजार रुपयांची ई-तिकिटे जप्त केली आहेत.

चेंबूर येथे अमर महलजवळ रमेश इलेक्ट्रिकल या दुकानात गैरमार्गाने रेल्वेची आरक्षित तिकिटे चढ्या दराने विकली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या संयुक्त पथकाला मिळाली होती.

त्यानुसार, या पथकाने तिथे पाळत ठेवत शहानिशा केली. त्यानंतर केलेल्या प्रत्यक्ष तपासणीनंतर दुकानातील संदीप शर्मा, शिवकुमार गुप्ता या दोघांनी पर्सनल आयडीचा वापर करून जादा दराने तिकिटांची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यासाठी त्यांनी अवैधरीत्या एका सॉफ्टवेअरचाही वापर केल्याचं स्पष्ट झालं आहे.

बेकायदेशीरपणे करत होते तिकिटांचे आरक्षण

‘निओ’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने हे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून बेकायदेशीरपणे तिकीट आरक्षित करत होते. यासाठी 41 वैयक्तिक आयडींचा वापर हे दोघं करत होते. या जोडीकडून एक लाख 15 हजार 425 रुपये किमतींची 42 ई-तिकिटे जप्त करण्यात आली. याबाबत कुर्ला आरपीएफ पुढील तपास करत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या