नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो National Crime Records Bureau (NCRB) च्या 2024 च्या अहवालानुसार मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.
मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या अहवालात 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये मुंबईतील नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 7.1 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. देशातील 19 महानगरांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण घटले असताना मुंबईत मात्र वाढ झाली आहे.
मुंबईत 2024 मध्ये मुलांविरोधातील 3,374 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. देशातील शहरांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा आकडा आहे. 2022 मध्ये 3,178 तर 2023 मध्ये 3,110 गुन्ह्यांची नोंद झाली होती.
2024 मध्ये मुंबईत मुलांच्या उघड्यावर टाकून देण्याच्या 15 घटना, गर्भहत्येच्या 3 घटना, मुलांची खरेदी-विक्रीसंदर्भातील 2 प्रकरणे आणि 8 खून प्रकरणांची नोंद झाली. यामध्ये बलात्कारानंतर खुनाच्या एका प्रकरणाचाही समावेश आहे. तसेच एका बालकाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरणही नोंदवण्यात आले.
लैंगिक अत्याचाराची प्रकरणेही चिंतेचा विषय ठरली आहेत. मुंबईत Protection of Children from Sexual Offences Act (POCSO) अंतर्गत 1,416 गुन्हे नोंदवले गेले असून त्यात 660 बलात्कार प्रकरणांचा समावेश आहे.
तसेच मुलांच्या अपहरण आणि बेपत्ता होण्याच्या 1,831 घटना नोंदवण्यात आल्या. यापैकी 1,587 प्रकरणांमध्ये बेपत्ता मुलांना अपहरण झाल्याचे मानण्यात आले.
2023 मध्ये मुंबईत एकूण 65,441 गुन्हे नोंदवले गेले होते. हा आकडा 2024 मध्ये वाढून 70,054 वर पोहोचला. 2023 मध्ये विविध गुन्हेगारी प्रकारांमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर होती, मात्र 2024 मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांसह अनेक प्रकारांमध्ये दिल्लीखालोखाल मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
अहवालानुसार खून, दरोडे, चेन स्नॅचिंग, खंडणी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र विनयभंग, लैंगिक छळ, हुंडाबळी, बलात्कार आणि POCSO अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 5.5 टक्के वाढ झाली असून मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 8.5 टक्के वाढ झाली आहे. कायद्याच्या संघर्षात सापडलेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रकरणांमध्ये 11 टक्के वाढ झाली आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2024 मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये तब्बल 52.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.