मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. Brihanmumbai Municipal Corporation च्या स्थायी समिती सभागृहात चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटीया (Laxmi Bhatia) यांच्या पर्समधून तब्बल 20 हजार रुपये चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. ही घटना समितीच्या बैठकीदरम्यान घडली. बैठकीतून त्या थोड्या वेळासाठी जेवणासाठी बाहेर गेल्या असताना त्यांनी आपली पर्स जागेवरच ठेवली होती. परत आल्यानंतर पर्स उघडी दिसली आणि त्यातील रोख रक्कम गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
या प्रकारामुळे मनपा मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः ज्या सभागृहात महत्त्वाचे प्रशासकीय आणि आर्थिक निर्णय घेतले जातात, तिथेच अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मनपाच्या सुरक्षा विभागाला कळवण्यात आलं. मात्र, सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे नेमकं काय घडलं आणि चोरी कोणी केली, हे शोधणं कठीण ठरत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर मनपा मुख्यालयातील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा