गिरगावातील ३० वर्ष जुन्या वडाच्या झाडावर हातोडा, झाड तोडणाऱ्यांना अटक

सौजन्य - मिड डे
सौजन्य - मिड डे

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करून गिरगावमधील ब्रिटिशकालीन वडाचे झाड तोडणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करून ट्विट केलं. त्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या प्रकाराची दखल घेतली.

झाड कापणाऱ्या ५ संशयितांना पोलिसांनी माहीम परिसरातून शनिवारी ताब्यात घेतलं. हिरालाल सेवकराम दर्शन, मोहम्मद शफीक उर्फ अब्दुल इकबाल अशी पाच पैकीं दोन संशयितांची नावं आहेत. पोलिसांकडून या संशयितांची चौकशी सुरू आहे.

मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ एक ब्रिटिशकालीन वडाचे झाड होते. या झाडाला कापण्यासाठी ५ जणांनी महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याची बतावणी केली. त्यांनतर रस्त्याच्या बाजूला बॅनर लावल्यानंतर जास्त पैसै मिळतात म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री हे वडाचे झाड कापले.

स्थानिकांनी झाड कापणाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता, आपण महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, झाड कापण्याची महानगरपालिकेनं परवानगी दिल्याची बतावणीही त्यांनी केली.

पण स्थानिकांना संशय आल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत हा प्रकार कळवण्यात आला. या घटनेची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली. झाड कापल्याच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.


पुढील बातमी
इतर बातम्या