Exclusive आयपीएलवर दहशतवादाचं सावट?

देशभरात सध्या सर्वांची करमणूक करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचं उघडकीस आलं आहे. वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडंट व त्यांना जोडणाऱ्या मार्गाची रेकी दहशवाद्यांनी केल्याची माहिती प्राप्त झाल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय क्रिकेटपटूंच्या प्रवासादरम्यान सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिका-यानं सांगितलं.

कडक बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात  कसल्याही घातपाती कारवाया होऊ नयेत म्हणून वानखडे स्टेडियमसह खेळाडू थांबलेल्या हाॅटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आयपीएल सामन्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तशा लेखी सूचना करण्यात आल्या आहेत. क्रिकेकपटू राहत असलेले हॉटेल ट्रायडंट, वानखेडे स्टेडियम व या मार्गाची रेकी दहशतवाद्यांकडून करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झाल्यामुळं स्टेडियम व हॉटेल परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय खेळाडूंच्या बसच्या सुरक्षेसाठी प्रवासादरम्यान मार्क्‍समन वाहन बस सोबत ठेवण्यात येत आहे.

याशिवाय हॉटेल व स्टेडियमच्या बाजूच्या मार्गांवर कोणतेही संशयीत वाहन उभे राहू नये यासाठी सामन्यांपूर्वीच सर्व वाहने हटवण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत. याशिवाय खबरदारी म्हणून क्रिकेपटूंना ने-आण करणाऱ्या वाहनाच्या चालकाची चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे. तसंच टीम व्यवस्थापकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला खेळाडूंना भेटण्यास देऊ नये, अशा सूचना करण्या आल्या आहेत.

स्टेडियमची रेकी 

आयपीएलवर दहशतवाद्यांचे सावट लक्षात घेता वानखेडे स्टेडियमच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर एक सहाय्यक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय हॉटेल रुम आणि स्टेडियममध्ये सामने सुरू होण्यापूर्वी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या सहाय्याने तपासणी केली जात असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. २० एप्रिल २०११ रोजी आयपीएल सामन्यावेळी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी वकास अहमद याने तिकीट खरेदी करून वानखेडे स्टेडीयममध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मुंबई इंडियन व पुणे वॉरिअर्स यांच्यामध्ये सामना होता.

त्यानंतर २२ एप्रिलला मुंबई इंडियन व चेन्नई सुपरकिंग यांच्यातील सामन्यावेळीही वकास व त्याचा साथीदार असदुल्लाह यांनी स्टेडियम परिसराची रेकी केली होती. दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीत ही माहिती उघड झाली होती. तसंच २०१३ मध्ये स्टेडियम आवारात वेल्डींगसाठी वापरण्यात येणारे तीन बेवारस सिलेंडर आढळले होते. त्याच्या सहाय्याने घातपात झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे स्टेडियम परिसरातील बेवारस वस्तूंच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिलं जात असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 


हेही वाचा-

१० हजार पोलिस कर्मचारी 'टपाली मतदाना'द्वारे मतदानाचा हक्क बजावणार


पुढील बातमी
इतर बातम्या