दहिसरमध्ये नवविवाहितेचा हुंडाबळी

हुंडाबळी कायदा अस्तित्वात असताना देखील हुंडा घेण्याची प्रथा थांबण्याचे नाव घेत नाहीय. दहिसरमध्ये 19 वर्षीय नवविवाहितेचा हुंड्याच्या लोभापायी बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती, सासरा आणि दिर यांना अटक केली असून तीन नणंदा अद्याप फरार आहेत. सध्या पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसरच्या हनुमान टेकडी काजूपाडातील श्रमिक वसाहत चाळ क्रमांक 1 येथे राहणाऱ्या प्रशांत याचे लग्न सोलापूरमध्ये राहणाऱ्या यशवंती (19) हिच्याशी सहा महिन्यापूर्वी झाले होते. पण सासरच्या जाचाला कंटाळून यशवंतीने 31 मे रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी याची माहिती मृत महिलेचे नातेवाईक आणि सोलापूरमध्ये राहणाऱ्या तिच्या वडिलांना दिली. त्यानंतर मृत तरुणीचे वडील शिवाजी लोढे मुंबईत आले. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर दहिसर पोलिसांनी भादंवि कलम 304, 498 अ आणि 34 अंतर्गत मृत तरुणीचा पती प्रशांत फरड, सारसे दशरथ फरड आणि दिर आकाश फरड यांना अटक केली आहे. यामध्ये अद्याप तीन नणंदा फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

बोरिवली पूर्वेकडील सुकरवाडीत राहणारी तिची मावस बहिण आणि तिची मैत्रिण माधुरीने दिलेल्या माहितीप्रमाणे, यशवंतीच्या सासरची मंडळी तिला वारंवार त्रास देत होते. सासरच्यांकडून तिचा नेहमी छळ केला जात असे. तिच्याकडून अनेकदा पैसे मागितले जात असत. त्याबद्दल यशवंती नेहमी सांगत असल्याचेही तिच्या मावस बहिणीने सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या