विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर शस्त्रासह एकास अटक

मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात कारवाई करून गुन्हे शाखा 7 च्या अधिकाऱ्यांनी एका 36 वर्षीय व्यक्तीला शस्त्रांसह अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी हा नवी मुंबईचा रहिवासी असून त्याच्यावर भारतीय शस्त्र प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

मुन्ना राजबली दुबे (३६) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो नवी मुंबईतील कोपर खैरणे परिसरात राहतो. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरातील पवार वाडीत एक संशयित शस्त्र घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष-7 च्या पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता.

परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दुबेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन पिस्तूल, चार मॅगझिन आणि आठ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर भारतीय शस्त्र प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-7 मधील पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

आरोपीने येथे शस्त्र का आणले, याचा तपास सुरू आहे. दुबे याची चौकशी करत असताना अन्य संशयित आरोपींची माहिती मिळाली असून, या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा

दुकानाबाहेरील भांडणाला हिंसक वळण, एकाचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या