'तमाशा'त घडला 'तमाशा'

तमाशा पबमध्ये शनिवारी रात्री 'पेपर स्प्रे' प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे काही काळासाठी पब रिकामा करण्यात आला होता. मात्र, काही मिनिटांनी पब पुन्हा सुरू करण्यात आला. काही टवाळखोर ग्राहकांनी जाणून बुजून हे कृत्य केल्याचा संशय तिथे हजर ग्राहकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी 'तमाशा' पबकडून ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात घडलेल्या प्रकराची लेखी तक्रार देण्यात आली आहे.

पेपर स्प्रे आला कुठून?

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा तमाशा पबमध्ये शनिवारी रात्री ४०० हून अधिक ग्राहकांनी गर्दी केली होती. डिजेच्या तालवर हे सर्वजण नाचत असताना अचानक रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी गर्दीचा फायदा घेत पेपर स्प्रे स्प्रे केला. त्यामुळे एसीमध्ये सर्वच नागरिकांना ठसका आणि खोकला लागला. हळूहळू सगळे जण पबच्या बाहेर पडू लागले. या स्प्रेचा त्रास पबमधील कर्मचाऱ्यांनाही झाल्यानंतर पबच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी सुरू केली. पबचे सर्व दरवाजे आणि खिडक्या उघडून एसी बंद करण्यात आला. सुरूवातीला पबच्या किचनमध्ये काही तरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मग एसीमध्ये कुणीतरी पेपर स्प्रे फवारल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्राथमिक तपासणीत तसे काहीही आढळून आले नाही. या घटनेमध्ये कुणालाही त्रास झाला नसल्याचे 'तमाशा'कडून सांगण्यात आले आहे.

'तमाशा'मध्ये घडलेल्या घटनेची पबकडून लेखी तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तसेच अग्निशमन दलाकडूनही लवकरच पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.

अहमद पठाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाणे

२० मिनिटांनंतर पब पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र, त्यावेळी ग्राहकांना कोणताही त्रास झाला नाही. याबाबत 'तमाशा'कडून घडलेल्या या प्रकाराची सीसीटीव्हीच्या आणि इतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे तपासणी सुरू असून ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या