महिलेला धक्का लागल्याने प्रवाशाला दाम्पत्याकडून मारहाण, प्रवाशाचा मृत्यू

महिलेला धक्का लागल्यामुळे दाम्पत्याने एका तरूणाला सोमवारी शीव रेल्वे स्थानकावर बेदम मारहाण केली. त्यावेळी हा तरूण फलाटावरून रेल्वे मार्गावर पडला आणि त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी कोल्हापूरमधील रहिवासी असलेल्या दाम्पत्याला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली.

दिनेश राठोड (२६) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नवी मुंबईतील घणसोली गावातील रहिवासी आहे. तो बेस्टमध्ये वाहकपदावर काम करत होता. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने (३१) व शीतल अविनाश माने (३०) यांना अटक केली.

दोघही कोल्हापूरमधील रहिवासी असून त्यांना मंगळवारी दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता.  शीव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर सोमवार, १३ ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद झाली होती. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीदरम्यान राठोड जिन्यावरून फलाट क्रमांक १ वर आला. त्यावेळी एका महिलेला त्याचा धक्का लागला. त्यानंतर महिलेने त्याला छत्रीने मारले.  तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने राठोडला मारहाण केली. त्यानंतर तो रुळांवर पडला.

तो तेथून उठून फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असताना त्याला धीम्या लोकलने धडक दिली. त्यात तो जखमी झाला व त्यानंतर मृत्यू झाला. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून अविनाश व शीतल दोघांनाही अटक केली.


हेही वाचा

पश्चिम रेल्वेवरील 15 कोचच्या लोकल ट्रेनचे वेळापत्रक जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या