डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जामीन

डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सोबतच न्यायालयाने या तिघींना  मुंबईबाहेर जाण्यास देखील मनाई केली आहे. 

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील  खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डाॅ. पायलला जातिवाचक शेरेबाजी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा डॉ. हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) आणि डाॅ. भक्ती मेहरे (२६) या तिघींवर आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर या तिघींनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत मुंबई बाहेर जाण्यास मनाई केलीआहे. सोबतच त्यांना नायर रुग्णालयात जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. या तिघींना एक दिवसआड न्यायालयात हजेरी देखील लावावी लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या