मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने तपासणी करीत संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. या अधिकाऱ्यांना बुधवारी रात्री काही संशयास्पद वस्तू धावपट्टीच्या जवळ फेकलेल्या आढळल्या. अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या असल्याच उघडकीस आलं आहे.
गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरून काही वस्तू भिरकावल्याचे स्पष्ट झाल्याने सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केले. या पथकाला येथे पेट्रोल भरून काही बाटल्या फेकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी लागलीच त्यांना निष्क्रिय केले. या घटनेने विमानतळावरील कामकाज किंवा उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.
सीआयएसएफने याबाबत स्थानिक पोलिसांना पाचारण केले असून त्यांनी संरक्षक भिंत परिसर आणि झोपडपट्टी परिसर पिंजून काढूनही संशयितांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. दिल्लीनंतर मुंबई देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे.
जैश आणि लष्कर संघटनेचे दहशतवदी हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने दिल्ली पोलीस, जीआरपी, लोकल पोलिसांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं आहे. महत्त्वाची सुरक्षा प्रतिष्ठाने दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत.