दाऊदच्या नावाने धमकवणाऱ्या 'त्या' दोघांना अटक

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा हस्तक असल्याचं सांगून वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलेकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली. हरीष कुमार यादव आणि बिलाल शमसी अशी या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी न्यायालयानं दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एकाचा शोध सुरू

वांद्रे परिसरात एका नामांकित संस्थेच्या संचालिका असलेल्या महिलेस मागील अनेक दिवसांपासून दाऊद आणि छोटा शकीलचा हस्तक असल्याचं सांगून दोघे आरोपी १ कोटी रुपयांची खंडणी मागत होते. याबाबत नोव्हेंबर महिन्यात पीडित महिलेनं मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी हरीष कुमार यादव आणि बिलाल शमसी या दोघा आरोपींना अटक करत ललित शर्मा नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

आरोपी हरीषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याचे ललितच्या पत्नीशी संबध होते. यावरून ललित आपल्याला वारंवार धमकावत होता. ललितच्याच सांगण्यावरूनच आपण त्याच्या फोनवरून तक्रारदार महिलेस पैशासाठी धमकावल्याची कबुली हरीषने पोलिसांसमोर दिली. त्यामुळे या प्रकरणात पोलीस ललित शर्माचा शोध घेत आहेत.

आरोपींची पार्श्वभूमी

मूळचा दिल्लीचा असलेला ललित शर्मावर विविध पोलीस ठाण्यात ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ललित हा वांद्र्यात राहणाऱ्या बिलालच्या संपर्कात असल्यानं पोलिसांनी बिलालला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपी बिलाल शमसी याचा सहभाग आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली. बिलालवर यापूर्वीही दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो वांद्रे येथे वास्तव्यास होता. बिलालवर पायधुनी आणि वांद्रे पोलीस ठाण्यात खंडणी, जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर बिलाल दाऊद आणि छोटा शकिल टोळीशी सलग्न असल्याबाबत गुन्ह्यांची नोंद आहे. बिलाल परदेशात असलेल्या अनेकांच्या संपर्कात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. या सर्व प्रकरणामागे बिलालचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या