मुंबईत रेल्वेतून प्रवास करताना अभिनेता टायगर श्राॅफ सारखं धावत्या लोकलमध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. स्टंटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वडाळा जीआरपी पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे. राहुल चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे.
घाटकोपर मध्ये राहणारा राहुल चव्हाण हा अभिनेता टायगर श्राॅफचा चाहता आहे. टायगर श्राॅफ प्रमाणे तो स्वत:चा जिव धोक्यात टाकून अनेक स्टंट करायचा. नुकताच टायगर श्रॉफचा 'बागी ३' चिञपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. त्यात श्रॉफ एका धावत्या वाहनात स्टंट करताना दाखवला आहे. तो स्टंट राहुलच्या डोक्यात फिट बसला होता. तो स्टंट करण्यासाठी त्याने अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात ही टाकला होता. शनिवारी सकाळी ११ वा.राहुल विना तिकिट हार्बर लोकलने गोरेगावला जाणाऱ्या लोकलच्या शेवटच्या डब्यातून प्रवास करत होता.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपण टायगर श्रॉफचा फॅन असून त्याच्यासारखे स्टंट फार पूर्वीपासून करत असल्याचं सांगितलं. या आधीही राहुलला पोलिसांनी असे जीवघेणे स्टंट करताना अटक केली असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली आहे.