सोशल मीडियावर आधी मैत्री, नंतर अश्लील फोटो टाकण्याची धमकी

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

सोशल मीडियावरील मित्रावर विश्वास ठेवणे आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. मित्रावर विश्वास ठेवत तरुणी पाठवलेले काही खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना आग्रीपाडा पोलिसांनी कांदिवलीतून अटक केली आहे. किशन गुप्ता(20) आणि अविनाश गुप्ता(21) अशी या दोन अटक आरोपींची नावे आहेत.

कसे मिळवले छायाचित्र 

आग्रीपाडा परिसरात राहणारी 19 वर्षीय विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर किशनसोबत ओळख झाली होती. दोघेही सोशल मीडियावरून एकमेकांशी संभाषण करत होते. त्यातून दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यातून किशनने तरुणीचा विश्वास जिंकून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र मिळवले. ते छायाचित्र मिळाल्यानंतर त्याने अविनाशसोबत तरुणीला धमकवण्यास सुरुवात केली.

आणि दिली धमकी

तिने 50 हजार रुपये न दिल्यास आरोपींनी हे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. यावेळी किशनने तरुणीला ती रक्कम अविनाशला देण्यास सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने हा सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 384, 385, 354(ड) आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी अशाच पद्धतीने आणखी तरुणींनाही धमकावलं आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या