परीक्षेला डमी बसणे भावंडांना पडले महागात

धाकटा भाऊ नापास होण्याच्या भीतीने मोठ्या भावाने परीक्षेला बसण्याचा धक्कादायक प्रकार नागपाड्याच्या साबुसिद्दिकी कॅालेजमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी दोघा भावंडांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

लहान भावाच्या परीक्षेला मोठा भाऊ बसला

अंधेरीत रहाणारा २२ वर्षाचा मुलगा हा साबुसिद्दिकी कॅालेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तर त्याचा २५ वर्षांचा मोठा भाऊ हा नुकताच इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

लहान भावाची सध्या परीक्षा सुरू होती. मात्र अभ्यस न झाल्याने आपण नापास होण्याची भीती त्याने मोठ्या भावाला बोलून दाखवली होती. आपल्या भावाचे वर्ष वाचवण्यासाठी दोघांनी एक शक्कल लढवली आणि चेहऱ्यातील साम्यतेचा फायदा घेत मोठ्या भावाने परीक्षेला बसण्याच ठरवले.

पोलिसांनी केली अटक

त्यासाठी लहान भावाच्या हॅाल तीकीटावर मोठ्या भावाने आपला फोटो लावला आणि त्याच्या झेरॅाक्स काढून सोमवारी परीक्षेला बसला. मात्र परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

दोघांनाही महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि नमूना परीक्षामध्ये होणारा गैरव्यवहार प्रतिबंध अधिनियम १९८२ च्या कलम ७, ८ तसेच फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या