पोस्ट मास्तरनं लुटली सरकारी तिजोरी

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - वडाळा ट्रक टर्मिनलच्या टपाल कार्यालयात पोस्ट मास्तर म्हणून काम करणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यांनं पोस्टातील तिजोरीवरच डल्ला मारला. ही घटना वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. दीपक हरिशचंद्र गवाळी (वय-46) असं या भामट्याचं नाव असून, तो पोस्ट मास्तर (इन्चार्ज) म्हणून वडाळा ट्रक टर्मिनल पोस्टात कार्यरत होता. तीन दिवसापूर्वी टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर टपाल कार्यालयातील अकाऊंटची तपासणी केली असता 15 लाखाची रोकड तिजोरीतून गायब असल्याचं उघड झाल्यानं या घटनेचा पर्दाफाश झालाय. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी पोलीस निरीक्षक मोहन येडूरकर यांना गुंन्हेगाराला तात्काळ ताब्यात घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान पोलीस निरीक्षक येडूरकर यांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लांभाते यांच्यासह टपाल कार्यालयात जाऊन भामट्या पोस्ट मास्तराच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक चौकशी दरम्यान या भामट्यानं सरकारी तिजोरीतून 15 लाख रुपये लांबविल्याची कबूली दिली. आणि रक्कम आपल्या मित्रांना वाटल्याचं तो सांगत आहे. त्याच्या बँक खात्यातील 4.5 लाख रुपये तर इतर जागेतून 1.5 लाख रुपये वसूल करण्यात पोलिसांना यश आलंय. आतापर्यंत एकूण 6 लाख रुपये पोलिसांनी रिकव्हर केले असून, उर्वरित 9 लाख रुपयांचा तपास सुरु असल्याचं पोलीस निरीक्षक मोहन येडूरकर यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या