मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी प्रिती जैनला तीन वर्षांची शिक्षा

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मॉडेल प्रिती जैनला दोषी ठरवले आहे. प्रिती जैनने मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप केला होता. मधुर भांडारकरांनी चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन आपले लैंगिक शोषण केले असा आरोप तिने केला होता.

प्रितीला तीन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजार रूपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला आहे. प्रितीसह तिचे दोन साथीदार नरेश परदेशी आणि शिवराम दास यांना देखील कोर्टाने दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरीत दोघांची पुराव्याअभावी सुटका केली आहे.

मधुरला उडवण्यासाठी प्रितीने 2005 साली सुपारी दिल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. सुरुवातीला प्रितीने परदेशीची भेट घेतली आणि या कामासाठी 75,000 रूपये देखील मोजले होते. तर या गुन्ह्यासाठी हत्यार मिळवण्याची जबाबदारी दासवर सोपवण्यात आली होती. सुपारी देऊन देखील काम न झाल्याने तिने पैसे परत देण्याची मागणी केली होती. हे प्रकरण गँगस्टर अरुण गवळी पर्यंत पोहोचलं आणि नंतर पोलिसांना याची टीप मिळाली. 10 सप्टेंबरला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी परदेशी आणि प्रीती जैनला अटक केली होती. काही दिवासांनी शिवराम दासला देखील अटक करण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या