गरोदर महिलेची आत्महत्या

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

धारावी - येथील क्रॉस रोडवरील नवजीवन सोसायटीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेने फाशी घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुजाता अंतोनि बर्गर (वय - 28) असे तिचे नाव असून, आपल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप सुजाताच्या नातेवाईकांनी केला होता. मात्र सुजाताचे आई-वडील गावाहून आल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री सुजाताच्या पती विरोधात माहीम येथील शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, या याप्रकरणी सुजाताचा पती अंतोनि बर्गर याला अटक करण्यात आली आहे.

नवजीवन सोसायटीत राहणाऱ्या सुजाताला दोन छोट्या मुली असल्याने तिसरे अपत्य नको म्हणून गेल्या दीड महिन्यापासून तिचा नवरा आणि घरातील मंडळी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. रोज शिवीगाळ आणि मारहाण करून तिला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली वावरत होती. मृत्यूपूर्वी फोनवरून नवरा घरातील मंडळी खूप त्रास देत असल्याचे सुजाताने सांगितल्याचे वॅनिला मेरी (मावशी) यांनी सांगितले. सुजाताला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर जोवर कारवाई होत नाही आणि सुजाताला न्याय मिळत नाही तो पर्यंत सुजाताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा तिच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र आई-वडिलांनी तक्रार नोंदविल्यानंतर शाहूनगर पोलिसांनी सुजाताच्या पतीला अटक केली. त्यामुळे अखेर तिचा मृतदेह तिच्या आई-वडिलांनी ताब्यात घेतला.

सुजाताचा मृत्यू फाशीने झाला की अन्य कोणत्या कारणाने हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर अंतोनि बर्गर याला कलम 498 आणि 306 अंतर्गत अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे, असे शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. बी. थोरात यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या