हनी ट्रॅपने आरोपीला अडकवले जाळ्यात

रेल्वेत नोकरीला लावण्याचं आश्वासन देऊन फरार झालेल्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी हनी ट्रॅपच्या मदतीने अटक केली आहे. रामर सुरलई पिल्लई असं या आरोपीचं नाव आहे. नुकतीच त्याने नोकरीला लावतो असं सांगून एकाकडून दीड लाख रुपये उकळले होते. अंधेरी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अशी केली फसवणूक

सायन परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीच्या मुलाची शासकिय नोकरी मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. अशातच एके दिवशी काही कामानिमित्त तक्रारदार विलेपार्ले येथे आले होते. त्यावेळी रेल्वेच्या प्रवासादरम्यान रामर हा त्याच्या बाजूला बसला होता. त्यावेळी रामर हा फोनवरून एका व्यक्तीला शासकिय नोकरी मिळवून देण्याच्या गोष्टी करत असल्यानं तक्रारदार रामरच्या संपर्कात आले. त्यावेळी रामरने त्यांना तुमच्या मुलाला नक्की रेल्वेत नोकरी मिळवून देणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. 

त्यावेळी तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार रामरने तक्रारदाराला भायखळा येथे बोलवलं. त्या ठिकाणी एका रुग्णालय परिसरात रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याचे घरातले आजारी असून आपण त्यांनाच भेटायला जात असल्याचं सांगत, तक्रारदारांना रुग्णालय परिसरात थांबवलं. परत आल्यानंतर रामरने तक्रारदारांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदारांनी पैसे दिले. त्यानंतर दुसऱ्या भेटीत १ लाख रामरने तक्रारदारांकडून घेत दोन महिन्यात रेल्वेकडून काॅल येईल, असं आश्वासन दिलं.

पण काॅल काही आला नाही

मात्र कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही रेल्वेकडून कोणताही काॅल आला नाही. रामरशी संपर्क साधला असता त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला. त्यानंतर तक्रारदाराने रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी रामरला पकडण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र रामर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांनी हनी ट्रॅपचा वापर करून रामरच्या मुस्क्या आवळल्या

पुढील बातमी
इतर बातम्या