डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटणारे अटकेत

सराफाच्या कामगारावर पाळत ठेऊन त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत एक कोटी 33 लाखांचे दागिने पळवणाऱ्या चौघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं अाहे. सुरेश अशोक डोके (36), महेंद्र प्रकाश चौधरी उर्फ मारवाडी उर्फ गुरबीन (25), समीर फकिरा सानप उर्फ सत्या (29) आणि विलास हनुमंत पवार अशी अटक आरोपींची नावं आहेत. न्यायालयाने या आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणि पैशांची बॅग पळवली

लोअर परळच्या इंडस्ट्रीअल इस्टेट येथील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातून 27 ऑक्टोबरला मुकेश बुखार हा निघाला होता. रस्त्यातून तो चालत जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी मुकेशच्या डोळ्यात अचानक मिरचीची पूड टाकली. त्यावेळी मुकेशने स्वतःचा बचाव करण्यासाठी या दोघांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी मुकेशवर चाकूने हल्ला करून त्याच्याजवळील बॅग हिसकावून पळ काढला.

आरोपींना अटक, मुद्देमाल हस्तगत

या घटनेमुळे घाबरलेल्या मुकेशने तात्काळ याची माहिती मालकाला दिली होती. त्यानंतर मालकाने ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपींना अटक केली.

आरोपींकडून एक कोटी 15 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक आरोपींविरोधात शिवडी, एलटी मार्ग, निर्मलनगर आणि भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने या चारही आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या