एसटी संप: एसटी कर्मचारी आणि सदाभाऊ खोत यांना मुंबईत येण्यापूर्वीच अडवलं

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना वाशी चेकनाक्याजवळ थांबवण्यात आलं आहे.

'हे आंदोलन चिघळवण्याचं काम राज्य सरकारनं केलं. शांततेच्या मार्गानं आझाद मैदानावर एसटी कर्मचारी येतील, मंत्रालयालयाऐवजी आझाद मैदानात येण्याचं आवाहन प्रशासनानं केलं होतं. त्यांच्या आवाहनाला आम्ही संमती दिली होती. पंरतु त्यापूर्वीच आम्हाला अडवण्यात आलं. राज्यभरातून जवळपास ५० हजार एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, सर्वांनाच कुठेना कुठे पोलीस बॅरिकेड्स लावून अडवत आहेत. ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. आपण त्यांना त्यांचा हक्क मागण्यापासून थांबवू शकत नाही', असं सदाभाऊ खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.

राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे.

२ दिवसांपूर्वी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढायचं ठरल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

ड्रग्ज प्रकरणावरून रोज पत्रकार परिषद घेऊन तुम्ही ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी टाहो फोडता. मात्र, ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील तुम्ही या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळे एसटी जोपर्यंत मला मुंबईत जाऊ देणार नाही, तोपर्यंत इथेच अन्नत्याग आंदोलन करणार आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या