आधी मारहाण नंतर माफी

बॉम्बे हाऊस - वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणप्रकरणी मुंबईच्या एमआरएमार्ग पोलीस ठाण्यात सहा ते सात सुरक्षारक्षकांविरुद्ध दंगल, मारहाण तसंच मालमत्ता नुकसान करण्याचा गुन्हा दाखल झालाय. त्याचबरोबर मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत देखील सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शुक्रवारी दुपारी टाटा समूहाचे निलंबित अध्यक्ष सायरस मिस्त्री बाॅम्बे हाऊसला आले असताना तिथे मोठ्या संख्येनं प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोहोचले होते. त्यात वृत्तपत्रांचे छायाचित्रकार देखील होते मात्र बॉम्बे हाऊसच्या सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकारांची अडवणूक केली एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी छायाचित्रकारांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मिड डे चे अतुल कांबळे, हिंदुस्थान टाइम्सचे अर्जित सेन यांना जबर मारहाण झाली तर टाइम्स ऑफ इंडियाचे एस एल संतकुमार धावपळीत जखमी झाले.

"अडीच वाजता सायरस मिस्त्री येणार होते पण दोन वाजून 20 मिनिटांनी ते बॉम्बे हाऊसला पोहचले असताच आम्ही त्यांचा फोटो काढण्यासाठी पुढे गेलो असता सुरक्षारक्षक आमच्यावर धावून आले आणि आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली'' अशी प्रतिक्रिया उपस्थित छायाचित्रकारानं दिली.

छायाचित्रकारांना झालेली मारहाण केमॅरात कैद झाली असून कश्याप्रकारे त्यांना अमानुषपणे मारलं जातंय हे अगदी स्पष्ट दिसतंय, याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. याप्रकरणी टाटा समूहाच्या वतीनं माफीनामा जाहीर केलाय. मात्र ज्या टॉप्स ग्रुपचे हे सुरक्षारक्षक होते त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या