शिवसेनेच्या उपविभागप्रमुखावर विक्रोळीत गोळीबार

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच गुरूवारी मुंबईत शिवेसनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे विक्रोळीत तणावाचं वातावरण पसरलं आहे. शेखर जाधव यांना काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

शेखर जाधव पहाटे टागोरनगर परिसरातील मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागली. परिसरात गोळीबार झाल्याचं कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराचा माग काढून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाधव यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  

पुढील बातमी
इतर बातम्या