मालाडमध्ये सेना उपशाखाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

अहमदननगर पाठोपाठ मालाडच्या कुरार व्हिलेजमधील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची अनोळखी व्यक्तींनी गोळ्या घालून निर्घुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दुचाकीहून आलेल्या दोघांनी सचिन यांच्यावर ४ गोळ्या झाडून पळ काढल्याचं स्थानिक रहिवासी सांगत आहेत. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.

का केली हत्या?

मालाडमधील अप्पापाडा येथील सचिन सावंत हे शिवसेनेच्या शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखाप्रमुख होते. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते मित्रांसोबत दुचाकीहून जात होते. सावंत यांची दुचाकी कांदीवलीच्या आकुर्लीरोडवरून गोकुळनगरात पोहचले असताना. दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी सावंत यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. या गोळीबारात दोन गोळ्या सावंत यांना लागल्यानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी सावंत यांना मृत घोषित केलं.

यापूर्वीही झाला होता हल्ला

कुरार गावच्या विकासासाठी एसआर प्रोजेक्ट सुरू आहे. याच प्रोजेक्टवरील मतभेदातून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावंत यांच्यावर यापूर्वी २००९ मध्ये अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यात ते बचावले होत. उत्तर मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात येण्याची ही तिसरी घटना आहे. या पूर्वी कांदीवलीच्या समतानगर परिसरात राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि बोरिवलीचे उपविभागप्रमुख अशोक सावंत यांची देखील अशा प्रकारे निर्घुण हत्या करण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या