पूर्व वैमनस्यातून टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला

प्रवासी म्हणून टॅक्सीत बसलेल्या तीन अज्ञातांनी रविवारी सकाळी एका टॅक्सी चालकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना चुनाभट्टी हायवे अपार्टमेंट समोरील द्रुतगती मार्गावर घडली. या घटनेत टॅक्सी चालकाच्या कानावर, हातावर, पोटावर तसेच पायावर चाकूने वार करण्यात आले असून त्याच्या डाव्या हाताचा अंगठा कापला गेला आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

गोवंडीतल्या शिवाजीनगर येथे राहणारे मोहम्मद शकील नसरुद्दीन कुरेशी (35) रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपली टॅक्सी घेऊन व्यवसायासाठी घराबाहेर पडले. ठाण्याच्या तीन हात नाक्यावर टॅक्सी उभी करून मोहम्मद पॅसेंजरची वाट बघत उभे होते. तेवढ्यात या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात व्यक्ती ठाणे ते ग्रॅन्टरोड आणि पुन्हा ठाणे असा प्रवास करण्याचे सांगून 1 हजार रुपये भाडे ठरवून टॅक्सीत बसल्या. सायन पनवेल मार्गावरून टॅक्सी भरधाव निघाली असताना विक्रोळी हायवेवर टॅक्सीतील एका व्यक्तीने लघुशंकेचा बनाव करत टॅक्सी थांबवली आणि तो लघुशंका आटोपून पुन्हा टॅक्सीत येऊन बसला.

काही वेळात टॅक्सी चुनाभट्टी मार्गावरील हायवेवर पोहचली असता त्याने पुन्हा काहीतरी बहाणा केला. त्यामुळे टॅक्सीचालकाने पुन्हा टॅक्सी थांबवली असताना दोघांनी त्याला मारहाण करत मागच्या सीटवर ओढले आणि तिसरा व्यक्ती चालकाच्या जागेवर बसून टॅक्सी चालवू लागला. ते पाहताच टॅक्सी चालक मोहम्मद कुरेशी घाबरला आणि जाब विचारू लागला. तेव्हा त्यातील एका व्यक्तीने चाकू काढून हल्ला सुरू केला. झालेल्या झटापटीत मोहम्मद कुरेशी जखमी झाला. जिवाच्या भीतीने घाबरलेल्या मोहम्मद कुरेशीने जोराने आरडाओरड केली. त्यामुळे चुन्नाभट्टी हायवे अपार्टमेंटजवळ आरोपी टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यालगत असलेल्या दुभाजकावर जोराची धडक दिली. अपघात झाल्याचे लक्षात येताच तिघांनी टॅक्सी सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मोहमद कुरेशीला पादचाऱ्यांनी शीव रुग्णालयात दाखल केले. हे तीनही हल्लेखोर अनोळखी असून गेल्या काही दिवसांपूर्वी टॅक्सीच्या रांगेवरून झालेल्या क्षुल्लक कारणावरून हल्ला झाल्याचा संशय टॅक्सीचालक मोहम्मद कुरेशी यांनी व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या