ओव्हरटेक केल्याच्या वादातून ओला चालकाची हत्या

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

ओव्हरटेक केल्याच्या रागातून दुचाकी चालकांनी केलेल्या मारहाणीत ओला कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजी नगर परिसरात उघडकीस आली आहे. चालकाचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर पळून गेलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात राहणारे आरोपी इमरान उर्फ इमो शेख (१९), अब्दुल वहाब उर्फ भोंदू अब्दुल रहिम इद्रीसी (२१) आणि फरार वाहिद अली शेख हे सोमवारी सायंकाळी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातून दुचारीवरून जात होते. त्यावेळी ओला चालक सलिम गुलाम शेख याच्या कारला आरोपींच्या दुचाकीने ओव्हरटेक केलं. यावरून झालेल्या वादावादीनंतर त्या तिघांनी सलिमची कार अडवली.

कार अडवून बेदम मारहाण

सलिमला काही समजणार तोच या तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत सलिम गंभीर जखमी झाला आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्यावेळी या तिघांनी तेथून पळ काढला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ते तिन्ही आरोपी रफिक नगरच्या दिशेने पळाल्याचे स्थानिकांनी सांगितलं.

त्यानुसार शिवाजी नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या तिघांची ओळख पटवत दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणातील तिसरा आरोपी वाहिद अली हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या