आरटीई घोटाळ्यात 2 पालिका कर्मचाऱ्यांसह दलाल अटकेत

अँटॉप हिल - सीबीएम शाळेत झालेल्या आरटीई घोटाळ्याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी दोघा पालिका कर्मचाऱ्यांसह एका दलालाला अटक केली आहे. यामध्ये आरोपी शैलेश जानकार (37) हा केईएम रुग्णालयातल्या आरोग्य विभागातला कारकून आहे, तर दुसरा आरोपी रामदास जाधव (35) हा गोवंडी एम पूर्व वॉर्ड ऑफिसमधला शिपाई आहे. तर तिसरा आरोपी प्रकाश कदम (40) हा दलाल आहे.

या तिघांनी पालकांना बनावट जन्माचे दाखले काढून दिल्याचे तपासात समोर आल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आल्याचे अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले.

सीबीएम शाळेच्या पहिलीतील प्रवेशादरम्यान मोठ्या संख्येने आरटीई अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जाची पडताळणी केली असता यातील काही अर्जांच्या तारखा या सारख्याच असल्याचं शाळेच्या मुख्यध्यापिका रिबेका शिंदे यांच्या लक्षात आले होते. अधिक तपास केला असता या मुलांचे जन्माचे दाखले बनावट असल्याचे समोर आले.

या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी यापूर्वी कामरुथीन शेख (37), युनूस बाजा (42) या दोन दलालांसह इम्रान सय्यद (32), फरझान (29), मुमताज (37), साईन (40), जरीना (37) आणि राबिया (26) नावाच्या पालकांना अटक केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या