सायबर गुन्ह्यांना आळा बसणार, प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष सायबर सेल

एकीकडे नेटचा स्पीड, सायबरचं जाळं, इंटरनेटची व्याप्ती वाढत असताना दुसरीकडे सायबर गुन्ह्यांची संख्या देखील तितक्याच वेगानं वाढत आहे. कधी कोणाच्या बँकेतून तर कधी एटीएम कार्डचा क्लोनिंग करून पैसे काढले जातात. डोळ्याची पापणी लावते न लावते तोच खात्यातील लाखो रुपये गायब होतात. अशावेळी आपल्याकडे हात धरून बसण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उरत नाही. त्यात सरकारने कॅशलेसला दिलेल्या प्राधान्यामुळे या सायबर गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कधी कोण्या तरुणीचं फेसबुक हॅक करून अश्लील फोटो टाकले जातात तर कधी ट्विटरवर अश्लील कमेंट केले जाते, हे सगळे प्रकार सायबर गुन्ह्यांत मोडतात. याच वाढत्या सायबर गुन्ह्यांशी दोन हात करण्यासाठी आत्ता मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली असून विशेष कक्षाची स्थापना केली आहे. "सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष" नावाच्या या कक्षाला फक्त सायबर गुन्हे हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कसा असेल मुंबई पोलिसांचा सायबर सेल

प्रत्येक पोलीस ठाण्यात हा सायबर सेल उभारण्यात येणार असून त्यात एका पोलीस निरीक्षकासह २ सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उप-निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. त्याचबरोबर ३ ते ४ अंमलदारांची नियुक्ती या सेलमध्ये करण्यात येणार आहे. सोमवारपासून या सेलच्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस या सेलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावेळी सायबर गुन्हे हाताळण्याकरता अत्याधुनिक अॅप आणि सॉफ्टवेअरने सुसज्ज असलेले टॅब देखील अधिकाऱ्यांना पुरवण्यात येतील. मुंबईतील एकूण पाच ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

सायबर हेल्पलाईन

सायबर गुन्ह्यांच्या मार्गदर्शनाबाबत याआधीच मुंबई पोलिसांनी सायबर हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिक सायबर हेल्पलाईनवर फोन करून मार्गदर्शन मिळवू शकतात, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

सायबर हेल्पलाईन ९८२०८१०००७

सायबर सेलची जबाबदारी

  • सायबर गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करणे
  • सायबर गुन्ह्यांना तडीस नेणे
  • सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे
पुढील बातमी
इतर बातम्या