डॉक्टरांना फसवणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकाला पोलीस कोठडी

मुंबईहून दौऱ्यानिमित्त चीनमध्ये गेलेल्या डॉक्टरांची फसवणूक करणारा 'अॅपेक्स टुअर्स अँड ट्रॅव्हल्स'चा मालक विनायक झरेकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जोपर्यंत भारतातून पैसे पाठविण्यात आले नव्हते, तोपर्यंत चीनमध्ये आम्हाला कैद्यांप्रमाणे वागविण्यात आल्याची प्रतिक्रिया दौऱ्याहून परतलेल्या एका डॉक्टरने दिली.

'मालाड मेडिकल असोसिएशन'चे अध्यक्ष हेमंत बरचा यांनी चीनमधील दौऱ्याकरीता 25 डॉक्टरांच्या समुहासाठी बोरीवली पूर्वेकडील 'अॅपेक्स टूअर्स अँड ट्रॅव्हल्स'मध्ये नोंदणी केली. तर 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने देखील येथे 39 जणांचा प्रवास आणि राहण्यासाठी नोंदणी केली. 'मालाड मेडिकल असोसिएशन'चा 25 डॉक्टरांचा समूह 16 मे रोजी जेट एअरवेजने हाँगकाँग येथे पाेहोचला. तेथून हा समूह चीनच्या सेंच्युरी प्लाझा हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र तेथे पाहोचल्यावर सर्वजण थक्क झाले. कारण हॉटेलमध्ये राहण्यासाठी या डॉक्टरांच्या समुहाचे पैसेच भरण्यात आले नव्हते. एवढेच नव्हे, तर 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या सदस्यांचे पैसेही भरण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला.

'मालाड मेडिकल असोसिएशन'चे अध्यक्ष हेमंत बरचा यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार दहिसर पोलिसांनी 'अॅपेक्स टूअर्स अँड ट्रॅव्हल्स'चा मालक विनायक झरेकर याला अटक केली.

या दौऱ्यावरुन परतलेल्या डॉक्टरांच्या समुहातील डॉ. मुकूंद राजपूत म्हणाले, चीनमध्ये आम्ही एकप्रकारे कैद्याप्रमाणे दिवस काढले. आम्ही हाँगकाँगजवळील एका हॉटेलमध्ये 18 ते 20 मे असे तीन दिवस राहिलो. आम्हाला राहण्यासाठी अत्यंत लहान खोल्या होत्या. तेथे प्रत्येक व्यवस्था आम्ही आमच्या पैशांनीच केली.
सेंच्युरी प्लाझा हॉटेलमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या समुहातील सदस्यांना हॉटेलने राहण्याची परवानगी दिली. पण कुणालाही जेवण दिले नाही. 24 तास सर्वजण उपाशीच होते. त्यानंतर जेव्हा भारतातून त्यांना पैसे पाठवण्यात आले, तेव्हा पुढील व्यवस्था करण्यात आली. आमच्यासाठी मागच्या 15 वर्षांतील हा अत्यंत वाईट अनुभव होता.

पुढील बातमी
इतर बातम्या