मांडुळ तस्करी प्रकरणी दोघांना अटक

ठाणे - गुन्हे शाखेने जिवंत मांडुळ सापाची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली असून दोन मांडुळांची सुखरूप सुटका देखील केली आहे. संदीप पंडित (21) आणि अनंता घोडविंदे (47) अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही वन्यजीवन कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 21 मार्च हा जागतिक वन्य दिवस होता आणि याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेने या दोन दुर्मिळ सापांची सुखरूप सुटका केली आहे.

मंगळवारी ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात दोन इसम सापांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र डोईफोडे यांना मिळाली होती. त्यांनी या ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत हे दोन मांडुळ जातीचे साप पोलिसांना सापडले. या दोन्ही सापांची किंमत 55 लाखांच्या घरात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.गडद-तपकिरी काळसर रंगाच्या या मांडुळ सापांबाबत अनेक गैरसमज आहेत आणि म्हणूनच त्याची तस्करी केली जाते. हा मांडूळ गुप्त धनाचा शोध लावतो असाही गैरसमज आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी केली जाते. तसेच औषध आणि जादूटोणा करण्यासाठी देखील या सापाचा वापर केला जातो. म्हणून देखील यांच्या तस्करीचं प्रमाण मोठं आहे. खरं सांगायचं तर शांत प्रवृत्तीचा हा साप निशाचर आहे. शेतातील उंदीर तसेच घुशींना हा साप खात असल्याने त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील ओळखलं जातं.

काय आहेत गैरसमज?

  • मांडुळाची पूजा करून सोडल्यावर तोच गुप्तधनाचा शोध लावतो
  • मांडुळाचा तोंडाकडचा आणि शेपटीकडचा भाग सारखाच असल्याने त्याला दोन तोंडे असल्याचा देखील गैरसमज अनेकांना आहे
  • हा साप सहा महिने एका तोंडाने आणि सहा महिने दुसऱ्या तोंडाने चालतो असा देखील गैरसमज आहे
पुढील बातमी
इतर बातम्या