इतक्या गाड्या चोरल्यात की, आठवत नाही त्या कुठे-कुठे उभ्या केल्यात!

मुंबईसह आसपास शहरांतून दुचाकी चोरून मिळेल त्या भावात विकणाऱ्या दोन सराईत दुचाकी चोरांचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मेहराज अब्दुलबारी शेख (१९) व मुस्ताक लालबाबू मन्सुरी (२०) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या २६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मात्र या दोघा सराईत चोरांनी याहूनही अधिक गाड्या चोरल्या असून आता या गाड्या आपण कुठं-कुठं उभ्या केल्या आहेत हेच आपल्याला आठवत नसल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुलीमुळे पोलिस चांगलेच गोंधळले असून पोलिसांकडून आता आणखी गाड्यांचा शोध सुरू आहे.

चोरांची पसंती अॅक्टीवाला

सध्या दुचाकीमध्ये अॅक्टीवा गाड्यांना मोठी मागणी आहे. मात्र त्याचवेळी हीच गाडी चोरण्यासाठी सोपी जात असल्यानं दुचाकी चोरांकडून अॅक्टीवा गाड्यांचीच चोरी मोठ्या संख्येनं होत असल्याचं चित्र आहे. तर या दोन्ही आरोपींच्या चौकशीतूनही हीच बाब समोर आली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेले मेहराज आणि मुस्ताक हे दोघेही दुचाकी चोर मानखुर्द परिसरात राहणारे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लहान वयापासून या दोघांनी दुचाकी चोरण्यास सुरूवात केली होती.

तीन मिनिटांत चोरी

रस्त्यावर जिथं कुठं दुचाकींची गर्दी असेल त्यावर डोळा ठेवत तिसऱ्या मिनिटाला दुचाकी गायब करण्याचं कबस या दोघा चोरांकडे होतं. तर गाडी चोरल्यानंतर पोलिसांपासून गाडी लपवण्यासाठी हे दोघे चांगलीच शक्कल लावत होते. ती म्हणजे पालिकेच्या पे अॅण्ड पार्कमध्ये नेऊन चोरलेल्या गाड्या उभ्या करायच्या. त्यानंतर या चोरलेल्या गाड्या ते दोघे विकायचे. चोरीच्या गाड्यांच्या विक्रीतून दोघांना प्रत्येक गाडीमागे दहा हजार रुपये तरी मिळायचे.

२६ दुचाकी हस्तगत

अशाप्रकारे या दोघा सराईत दुचाकी चोरांना न जाने आजवर किती दुचाकी चोरल्या आहेत. कारण या दोघांकडून पोलिसांनी २६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पण त्यांची चौकशी केली असता त्यांनी यापेक्षा किती तरी जास्त गाड्या चोरल्या असून आता त्या गाड्या कुठे-कुठे उभ्या केल्या आहेत तेच त्यांना आठवत नसल्याची कबुली चोरांनी दिली आहे. त्यामुळे चोरलेल्या गाड्यांची संख्या मोठी असून आता या गाड्या शोधण्याचं मोठं आव्हान शिवडी पोलिसांसमोर आहे.

असा पर्दाफाश

या दोघांनी नुकतीच यलोगेट परिसरातील एक अॅक्टीवा दुचाकी चोरली. या प्रकरणी संबंधिताने शिवडी पोलिसांत तक्रार झाली होती. त्यानुसार शिवडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी प्रकरणाच्या तपासासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला असता हे दोन सराईत दुचाकी चोर सीसीटीव्ही निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना शोधून काढत त्यांना ताब्यात घेतलं.

या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. तर चोरलेल्या दुचारी गॅरेज वा बनावट कागदपत्र तयार करणार्यांना देऊन त्या मोबदल्यात एका गाडीमागे दहा हजार रूपये घेत असल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या