समुद्रात बुडून गिरगावात दोन मुलांचा मृत्यू

समुद्रात आंघोळ करण्याच्या मोहापायी दोन तरुणांना आपला जीव गमावावा लागलाय. अथर्व सुनील खरुणकर (15) आणि धीरज प्रकाश लोकरे (16) अशी मृत तरुणांची नावे आहेत. धारावीत राहणारे सुनील खरुणकर, धीरज प्रकाश लोकरे, अभिषेत कोकणे आणि अनिकेत अजनर्स हे चौघेही गिरगाव येथील समुद्रावर शुक्रवारी फिरायला गेले होते.

यामध्ये अभिषेक कोकणे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अनिकेत अजनर्स हा सुखरुप आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण धारावीत हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक रहिवाशी प्रशासनावर खापर फोडत आहेत.

यामध्ये बचावलेला अनिकेत अजनर्स (13) याने दिलेल्या माहितीनुसार धारावीतील संत कक्कया मार्ग परिसरात राहणारे अथर्व, धीरज, अभिषेक आणि अनिकेत चौघे मित्र शुक्रवारी सायंकाळी गिरगाव चौपाटीवर फिरण्यासाठी गेले होते. 

उकाडा सहन न झाल्याने त्यांनी समुद्रात आंघोळ करायचं ठरवलं. मात्र त्यावेळी समुद्राच्या मोठ्या लाटा पाहून अनिकेत घाबरला. त्यामुळे त्याने तात्काळ किनारा गाठला आणि किनाऱ्यावर पोहू लागला. मात्र तोपर्यंत खोलवर पाण्यात जाण्याच्या चढाओढीत अथर्व, धीरज आणि अभिषेक लाटांच्या मारा सहन करत पुढे सरसावले होते. दरम्यान पुढे असलेले दोघे समुद्रात बुडू लागले. समोरील दृश्य पाहताच पाठी असलेला अभिषेक दोघांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा तोही बुडू लागला. हा सर्व प्रकार अनिकेतच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड केली. तेव्हा जीवरक्षकाचे लक्ष त्यांचाकडे वेधल्यानं जीवरक्षकाने तात्काळ खोल पाण्यात उडी घेत अथर्व आणि अभिषेकला पाण्यातून बाहेर काढले. परंतु धीरज त्यांच्या हाती लागला नाही. तात्काळ दोघांना उपचारासाठी जवळच्याच जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र अथर्वला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ नौदलाची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत धीरजचा शोध सुरू होता. तब्बल चोवीस तासाच्या शोध मोहिमेनंतर धीरजचा मृत्यदेह शनिवारी सायंकाळी मरिनड्राइव्हच्या किनाऱ्यावर सापडला.

पुढील बातमी
इतर बातम्या