हजारो रुपयांच्या गावठी दारूसह दोन तस्करांना अटक

वडाळा - नाकाबंदीदरम्यान गावठी दारूने भरलेल्या टॅक्सीसह दोन तस्करांना वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली. तर तिसऱ्या तस्कराने चालत्या टॅक्सीतून उडी घेऊन पोबारा केल्याची घटना वडाळा कोकरी आगार परिसरात शुक्रवारी घडली.

या घटनेत वडाळा टीटी पोलिसांनी हजारो रुपयांच्या गावठी दारूसह सँट्रो कार जप्त केली असून मुरुगन उर्फ अप्पू कुप्पुस्वामी देवेंद्र (वय - 21), दत्ताराम जानबा राऊत (वय - 53) यांना अटक केली. तर, त्यांचा तिसरा साथीदार चंग्याचा वडाळा टीटी पोलीस शोध घेत आहेत.

गावठी दारूवर बंदी असताना काही समाजकंटक गावठी दारू ठाण्याहून अँटॉप हिलमार्गे तस्करीचा छुपा व्यवसाय करीत असल्याची माहिती वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कांबळे यांनी गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना आपल्या पथकासह कोकरी आगार परिसरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला.

दरम्यान, कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार दिलीप मोकल, पोलीस नाईक ज्ञानदेव मिंडे, सुभाष चव्हाण, पोलीस शिपाई सूर्यकांत पोळ, शरद चव्हाण, किरण पाटील यांनी वेषांतर करून नाकाबंदी परिसरात सापळा रचला असता टॅक्सी क्र. एम एच 01 ए टी 6168 अँटॉप हिलच्या दिशेने भरधाव येताना दिसली. त्यावेळी चालकासह बसलेल्या इसमाची नजर पोलिसांवर पडली. त्याने तात्काळ चालत्या टॅक्सीतून उडी घेऊन झोपडपट्टीच्या दिशेने पोबारा केला. दरम्यान, पोलिसांनी टॅक्सी अडवून गावठी दारूच्या पोटल्यांसह टॅक्सी आणि दोन इसमांना ताब्यात घेतले. याप्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गावठी दारूच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या