दारू पार्टी करताना मुंबईकरांनो जरा सावधान!

मुंबई – न्यू इयरचं सेलिब्रेशन म्हटलं की सर्वात आधी असते ती दारू पार्टी. मात्र दारू पार्टी करताना मुंबईकरांनो जरा सावध व्हा, कारण तुमच्या प्याल्यात असलेली दारू कदाचित हलक्या प्रतिची वा बनावट असू शकते. कारण नववर्षाच्यानिमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य मुंबईत येते. त्यानुसार यंदाही बनावट मद्याचा सुळसुळाट मुंबईत असल्याचं राज्य उत्पादन शुल्काच्या गेल्या पंधरा दिवसांच्या कारवाईतून समोर आलं आहे. गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जुहू परिसरातून तब्बल पाच लाखांची गोवा आणि दमण बनावटीचे भेसळयुक्त मद्य जप्त केलं. तर गेल्या पंधरा दिवसात 20 लाख रुपये किंमतीचे मद्य जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे एफडीएने नुकत्याच वसईतून मुदतबाह्य मद्याचा साठा जप्त केला आहे.

मुदत संपून कित्येक महिने उलटलेल्या मद्याच्या बाटल्यांवरील लेबल काढून नवे लेबल लावून हे मद्य नववर्षाच्या निमित्ताने विक्रीस ठेवण्यात आल्याचं एफडीएच्या कारवाईतून समोर आलं आहे. या मद्याचे दोन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती एफडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. अशा बनावट आणि मुदतबाह्य मद्याचे सेवन आरोग्याला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन एफडीए आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलं आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या