विधान भवनाबाहेर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • क्राइम

गतीमान राज्य सरकारच्या धिम्या कारभाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात मंत्रालयात तीन आत्महत्येचे प्रयत्न झाले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा दुपारी ४ वाजेच्या सुमारास विधान भवनासमोर अंदाजे ६० ते ६५ वयोगटातील वृद्ध महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही महिला एका कामासाठी मंत्रालयात आली होती. मात्र मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर विधानभवन परिसरात तिने एका बाटलीत असलेलं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. गेटवर असलेल्या पोलिसांनी आणि बाहेरील काही नागरिकांनी या महिलेला तातडीने टॅक्सीत घालून सेंट जॉर्ज रूग्णालयात नेलं.

का केली आत्महत्या?

यावेळी तिच्यासोबत तिचा ३५ वर्षे वयाचा मुलगाही सोबत होता. या महिलेचं नाव सखुबाई विठ्ठल झाल्टे (६०) असल्याचं समजत आहे. झाल्टे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु इथं राहणाऱ्या आहेत.

मागच्या काही वर्षांपासून त्यांच्या जमिनीचा वाद सुरु असल्यामुळे त्या मंत्रलयात फेऱ्या मारत होत्या. यासंदर्भात अनेक अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुनसुद्धा काम होत नसल्याने, त्यांनी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान मंत्रलयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.

या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्या मुलाची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

झाल्टे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विषबाधेचे उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांनी प्यायलेला द्रव पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. तपासणी अहवालानंतरच त्यांनी विष प्यायलं की अन्य काय? हे स्पष्ट होऊ शकेल.

- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

पुढील बातमी
इतर बातम्या