लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध ठेवून कालांतराने लग्नाला नकार दिल्याने जुहूत एका तरुणीने ३० झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी धीरज विरेंद्र साह (२९) याला अटक केली आहे.

मंदिरात लग्न

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील ३० वर्षीय तरुणी तिच्या भावासोबत राहते. त्याच परिसरात धीरजचे मेडिकलचे दुकान होते. काही ना काही घेण्यासाठी तरुणी मेडिकलमध्ये येत असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली होती.१ नोव्हेंबर २०१८ रोजी धीरजने तरुणीला जेवण करण्यासाठी बोलावले होते. दोघेही वर्सोवा येथील एका हाॅटेलमध्ये जेवण करून तरुणीच्या घरी परतले. त्यावेळी धीरजने तिला लग्नाची मागणी घातली. तरुणीनेही होकार दिला. लग्नाचे आमीष दाखवून वर्षभरात धीरजने अनेकवेळा तरुणीशी शरीरसंबध ठेवले. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर धीरजने ओशिवरा परिसरातील एका मंदिरात तरुणीशी लग्न केल्याचा बनाव रचला. मात्र त्याने घरातल्यांची तरुणीशी भेट घालून दिली नाही. 

मित्राने वाचवलं 

धीरजच्या वागण्यावर तरुणीला संशय येऊ लागल्यामुळे तिने धीरजबाबत चौकशी केली असता त्याचे चार वर्षापूर्वीच लग्न झाले असल्याचे कळाले.  याबाबत तिने धीरजकडे जाब विचारला असता तो तिला टाळू लागला. याच मानसिक तणावातून २७ एप्रिल रोजी झोपेच्या ३० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी तरुणीचा मित्र तिला भेटण्यासाठी घरी आला होता. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणीला त्याने अंधेरीतील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. सध्या तरुणीवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी तरुणीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धीरज विरोधात भा.द.वि कलम ४२० आणि ३७६ नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.  


पुढील बातमी
इतर बातम्या