नायगावच्या महिला पोलिसाची आत्महत्या

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • क्राइम

मुंबई पोलिसांच्या नायगाव येथील सशस्त्र विभागातील प्रतीक्षा विशाल शेंडे (३५) या महिला पोलीस शिपायाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. सोमवारी दुपारी शीव ते कुर्ला स्थानकादरम्यान त्यांचा मृतदेह सापडला. आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नेमकं काय झालं?

नवी मुंबईतील दिघा येथे राहणाऱ्या प्रतीक्षा शेंडे अनेक वर्षांपासून आजारी होत्या. त्यामुळे त्या सशस्त्र विभाग, नायगाव इथंच नेमणुकीला होत्या. प्रतीक्षा या पोलीस दलात खेळाडू कोट्यातून कार्यरत होत्या. आजार बळावल्याने मागील २ वर्षांपासून त्या आजारपणाच्या सुट्टीवर होत्या.

सोमवारी त्या कामावर हजर झाल्या. त्यानंतर नायगाव येथील कार्यालयात गणवेश घालून येते, असं सांगून प्रतीक्षा बाहेर पडल्या त्या परतल्याच नाहीत. प्राथमिक तपासात त्यांनी हैदराबाद एक्स्प्रेसमधून समोरून येणाऱ्या दुसऱ्या लोकलखाली उडी मारली. प्रतीक्षा यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलं नसून याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस तपास करत आहेत. शिवाय, कार्यालयात नेमकं काय घडलं? याची देखील चौकशी सुरू आहे.

'इथं' सापडला मृतदेह

सोमवारी दुपारी शीव आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान प्रतीक्षा यांचा मृतदेह सापडला. शिवाय, कुर्ला पोलिसांना घटनास्थळी एक बॅगही मिळाली. यामध्ये गणवेश आणि ओळखपत्र मिळालं. यावरूनच प्रतीक्षा यांची ओळख पटली.

पुढील बातमी
इतर बातम्या