Exclusive: बलात्कार पीडित महिलेचा अपमान, गृहराज्यमंत्री केसरकरांविरोधात पोलिसांत तक्रार

मंत्रीपदाची खुर्ची मिळताच सर्वसामान्यांच्या वेदनांकडे पाहण्याची काही राजकारण्यांची दृष्टीच जणू धूसर होऊ लागते. ज्यांच्याकडे मतांचा जाेगवा मागून मंत्रीपदाची खुर्ची मिळवली, अशा पीडितांच्या व्यथा-समस्या जाणून घेण्याऐवजी उलट त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यापर्यंतही त्यांची मजल जाते. असंच एक धक्कादायक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. सामुहिक बलात्कारप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दाद मागण्यास गेलेल्या एका पीडित महिलेला केसरकर यांनी अर्वाच्च भाषेत अपमानीत करत मंत्रालयातील दालनाबाहेर काढल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. एवढंच नव्हे, तर केसरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रारही तिने मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?

सामुहिक बलात्काराला बळी पडलेली कल्याणची एका पीडित महिला आणि तिच्या मुलीशी बोलताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची जीभ घसरली. न्याय मागण्यासाठी गेलेल्या या पीडित महिलेला सर्वांदेखत "तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचं नाही" असं म्हणत दोघींनाही केसरकर यांनी त्यांच्या दालनातून हाकलून लावल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

अन्यायग्रस्त महिलेची कैफियत

मूळची जळगावची पीडित महिला सध्या कल्याण परिसरात राहते. मे २०१७ मध्ये कल्याणच्या मांडा परिसरात राहणाऱ्या पीडितेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर तेथील ७ जणांनी प्रसादात गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी महिला पोलिसांत गेल्यावर पोलिसांनी टाळाटाळ करत तब्बल दीड महिन्यानंतर तिची तक्रार नोंदवली. या प्रकरणात स्थानिक राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यातील ७ आरोपींपैकी केवळ एकावरच गुन्हा नोंदवल्याचा महिलेचा आरोप आहे.

आरोपींकडून धमकी

या पीडितेचा वेळोवेळी पाठलाग करून गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींकडून तिला धमकावलं जात होतं. त्यामुळे मागील ६ महिन्यांत पीडितेच्या कुटुंबियांना ५ वेळा घर बदलावं लागलं आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींवर देखील गुन्हा नोंदण्यात येऊन त्यांनाही अटक व्हावी. यासाठी मागील काही महिन्यांपासून पीडित महिला आणि तिची मुलगी विविध मंत्र्यांकडे चपला झिजवत आहे.

गृहराज्यमंत्र्यांकडे दाद

अखेर हे प्रकरण घेऊन पीडित महिला मुलगी आणि पतीसह राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्याकडे गेली. या प्रकरणात केसरकर यांनी पीडित महिलेला आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी पीडित महिला पुन्हा केसरकर यांना भेटण्यासाठी गेली.

सर्वांसमोर अपमान

त्यावेळी पीडितेने त्यांना घडलेला प्रकार आणि पोलिसांची बोटचेपी भूमिका सांगितली. त्यावर केसकरांनी आवाज चढवून उपस्थितांसमोर "तुमची लायकी काय आहे. आमच्या इथं येण्याची", असं बोलून दालनातून हाकलून लावलं. या प्रकरणी पीडित महिलेने सोमवारी रात्री मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात केसरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार केली आहे.

माझ्यावर एवढा मोठा प्रसंग ओढावला. त्यात गुन्हा नोंदवूनही पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आरोपी मोकाट आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून दाद मागण्यासाठी मी केसरकर यांच्याकडे गेली असता, त्यांनी अर्वाच्च भाषेत आमचा अपमान करून आम्हाला धमकावलं. या प्रकरणातील पाचही आरोपींना राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस पाठीशी घालत आहेत. जे राजकारणी एका पीडितेला न्याय देऊ शकत नाही. ते जनतेचे भलं काय करणार?

- पीडित महिला


हेही वाचा-

अक्षय कुमारचा माॅर्फ व्हिडिओ यु ट्यूबवर; सायबर पोलिसांत तक्रार

फॅशन डिझायनर आईची हत्या करणाऱ्या मॉडेल मुलाला पोलिस कोठडी


पुढील बातमी
इतर बातम्या