संचारबंदीचा गुढीपाडव्याच्या बाजाराला फटका

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच, राज्यातील दुकानं व हातावर पोट असलेल्यांना ३१ मार्चपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. त्यामुळं अनेकांना मोठ्या नुकसानाचा सामाना करावा लागतो आहे. त्यातच आता करोनाच्या उद्रेकामुळं आधीच कमी झालेली मागणी व आता संचारबंदीचा फटका गुढीपाडव्याच्या बाजाराला बसणार आहे. मुंबईभरात जवळपास १०० क्विंटल श्रीखंड व २७०० क्विंटल फुलांचा बाजार संकटात आला आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त फलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. परंतु, कोरोना व्हायरसच्या भितीनं घराबाहेर येत नसल्यानं त्यांचं नुकसान होत आहे. दादरच्या घाऊक फूलबाजारात यानिमित्तानं शेकडो किलो माल येतो. हा आकडा जवळपास २ लाख ७५ हजार किलोंच्या घरात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २० मार्चपासूनच ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचदरम्यानच गुढीपाडव्याच्या दिवशी मालाची आवक वाढणं अपेक्षित होतं. परंतु, ११ दिवस बाजार बंद राहणार असल्यानं लाखो किलोंची उलढाल बंद होणार आहे. गुढीपाडव्याला श्रीखंडाचीही भरपूर मागणी असते. मुंबईभरात १० हजार किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून किमान एक लाख किलो श्रीखंडाची विक्री होते. 

याखेरीज मिठाई आणि अन्य पदार्थांचा आकडादेखील जवळपास तेवढाच आहे. यामाध्यमातून श्रीखंडाखेरीज किमान ५० ते ६० क्विंटल मिठाई बाजाराला फटका बसणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या