मुंबई परिसरात पहिल्यांदाच 'महारुद्र शिवयाग'!

संपूर्ण जग सध्या एका अस्वस्थतेतून जात आहे. वातावरणातील बदलामुळे सतत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. युद्ध, दहशतवाद, साम्राज्यवाद यामुळे सर्वत्र अशांततेचे सावट पडलेले आहे. जगावरील, भारतावरील हे अशांततेचे मळभ दूर व्हावे, वैश्विक शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ठाण्यामधील 'याग धार्मिक संस्थेने' दिनांक १५ ते २२ फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये ऐरोली, नवी मुंबई येथील पटणी मैदानात 'महारुद्र शिवयागा'चे आयोजन केले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरुपाचा व एकूण ७०७ यज्ञांचा 'महारुद्र' आयोजित करण्यात येत आहे. भारतातील अग्रणी मठांमधील साधू, ब्राह्मण व महर्षी इत्यादी या यज्ञ समारोहाला उपस्थित रहाणार आहेत. एकूण ७ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला दररोज किमान २० हजार व्यक्तींकरीता अन्नदानाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव केदार जोशी यांनी सागितले. मिनी कुंभ मेळ्याची जाणीव करुन देणारा असा हा सोहळा राहील. ओम नम् शिवाय मंत्राचा अखंड जप, मंहताद्वारे कथन होणारी रामकथा, महारुद्र अभिषेक, १२ ज्योर्तिलींग प्रदक्षिणा, आध्यात्मिक संगीत सभा, प्रदर्शन इत्यादी कार्पामांनी सज्ज अशा या धार्मिक सोहळ्याचा प्रत्येकाने आनंद घ्यावा, असे आवाहन केदार जोशी यांनी केले आहे.

यज्ञाचे महत्व!

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन। तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः।।

हा मंत्र सर्वज्ञात असून त्यात यज्ञाची महती स्पष्ट करण्यात आली आहे. भारतीय, वैदिक संस्कृतीत यज्ञ परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.

पुराणकाळापासून ही गौरवशाली, भक्तिमय व वैज्ञानिक मूल्य असणारी यज्ञ परांपरा सुरु आहे. वेदशास्त्रात महारुद्राचे अनेक फायदे, विषद करण्यात आले. वैज्ञानिकदृष्ट्या शुद्ध तुपाच्या आहुतीमुळे पर्यावरणामधील हवेचे शुद्धीकरण होते, ज्यामुळे योग्य प्रमाणात पाऊस होतो. अर्थातच ज्यामुळे शेतीकरीता उत्तम वातावरण निर्माण होते. निश्चितच त्यामुळे आपल्या सारखा शेतीप्रधान देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होऊ शकतो. यज्ञामुळे धन - धान्याची सुबत्ता तर येतेच, पण दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्याची शक्ती यज्ञात असल्याची श्रद्धा भारतीय संस्कृतीत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वातावरणातील नकारात्मकतेचा (निगेटिव्ह एनर्जी) नाश होण्यास यज्ञामुळे मदत होतो. याच श्रद्धेने वैश्विक शांततेसाठी आम्ही या 'महारुद्र शिवयागाचे' आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मंदार वैद्य यांनी दिली.

कोणत्याही यज्ञातून केवळ धूरच निर्माण होतो, यज्ञ करणे म्हणजे केवळ वेळ, पैसा आणि मनुष्य श्रम वाया घालवणे, असा समज स्वत: ला बुद्धिवादी म्हणवणारे काही लोक करीत आहेत. तांत्रिक जंजाळाच्या मागे फरफटत जाणाऱ्या या तथाकथीत सुधारकांना आपल्या परंपरेतील, संस्कृतीमधील यज्ञ, मंत्रोच्चार इत्यादीचे महत्व दुर्देवाने समजलेच नाही किंवा ते त्यांना समजावून देण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो. ही भावना व हा उद्देश लक्षात घेवून आपली प्राचीन यज्ञ संस्कृती पुन्हा एकदा समाजात रुजवून त्याचे महत्व युवा तसेच भावी पिढ्यांना योग्य पद्धतीने पटवून दिले तर निश्चितच आपल्या भारत देशातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल. प्रत्येक चरा - चराचे आयुष्य आरोग्यमय आणि सुख सौभाग्यमय होईल, असा विश्वास वैद्य यांनी व्यक्त केला. भविष्यात या विषयाला वाहिलेल्या शाळा निर्माण करण्याचा संस्थेच्या मानस असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. तसेच हिंदू मंदिरांची व समाज केंद्रांची उभारणी करण्याच्या उद्देशाने प्रेरीत होऊन सदर समारोहाचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यज्ञाने प्रामुख्याने दोन उद्देश सफल होतात, पहिला म्हणजे वैश्विक प्रार्थना व दुसरा म्हणजे कर्मकांड. यजमान किंवा आयोजक विश्व कल्याणाचा संकल्प धरुन यज्ञाचे आयोजन करतात. संकल्पाशिवाय सिद्धी मिळत नसल्याने वैश्विक शांतता व समृद्धीकरीता 'याग धार्मिक संस्थे'मार्फत हा संकल्प धरण्यात आला आहे.

रामायण, महाभारतात या ग्रंथात देखील यज्ञाचे महत्व वर्णन केले आहे. धगधगत्या यज्ञकुंडामधून प्रत्यक्ष अग्नीनारायण प्रकट झाले आणि त्यांनी दशरथाला पायस दिले. ज्या प्रसादानेच पुढे पुरुषोत्तम श्रीराम, लक्ष्मण आदींचा जन्म झाला.

दुर्दैवाने पीढी दर पीढी अध्यात्मातील वैज्ञानिक सिद्धांत योग्य वेळी योग्य शब्दांत समोर न आल्याने काही गैरसमज निर्माण झाले आणि त्यामुळे काही ज्ञान लोप पावले. हेच काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले धर्म संस्कार पुनरुज्जीवीत करण्याचा हा प्रयत्न आहे.

यज्ञामध्ये पंचमहाभूतांची पूजा घडवली जाते. माती आणि पाण्यापासून म्हणजे पृथ्वी आणि जलापासून यज्ञवेदी बनवली जाते, त्यात महाभूतांचा समावेश असतो, प्रत्यक्ष अग्नी म्हणजे तेज महाभूताची स्थापना, पूजा आणि मंत्रोच्चाराच्या गजरात निर्माण होणारा धूर अर्थात वायू हे आकाशात विलीन होतात. या पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून मिळते ती प्रचंड अध्यात्मिक शक्ती आणि जीवसृष्टीला पोषक वातावरण. यज्ञाचा संकल्प हा विश्वशांतीचा आणि सर्व उपस्थितांना अध्यात्मिक अनुभुती देणारा असतो. यज्ञाचा आणखी एक फायदा असतो तो समुदायशक्तीचा. यज्ञ नेहमीच समूहाने केला जातो आणि म्हणूनच आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी '१०१ कुंडीय महारुद्र यज्ञ' सलग ७ दिवस करण्याचे आयोजिले आहे, असेही मंदार वैद्य यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या