शिष्यवृत्ती वाढवण्यासाठी अभाविपचं धरणे आंदोलन

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तातडीने अदा करण्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सरकारविरोधात गुरुवारी आझाद मैदानात निदर्शनं केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी केल्या 'या' मागण्या

पदवी आणि पदव्युत्तर शिष्यवृत्ती व फेलोशिप १५ दिवसांच्या आत देण्यात यावी, तसेच त्यात लवकरात लवकर वाढ करण्याची मागणी अभाविपनं केंद्रसरकारकडे केली आहे. तसंच अनुसुचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती प्रत्येक महिन्याला वेळेत दिल्या जाव्यात. 

तसंच विद्यार्थ्यांच्या वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी वसतीगृह उपलब्ध करावी, तसंच त्या प्रत्येक वसतीगृहात वार्डन, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्याव्यात. यांसारख्या इतर मागण्या गुरुवारी धरणे आंदोलनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या.

राज्यभर हजारो एसटी, एससी, ओबीसी विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची शिष्यवृत्ती प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात एससी वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली आहे. मात्र इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शिक्षण शिष्यवृत्तीअभावी धोक्यात आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील केंद्राबाहेर अभाविपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या २ हजार २५० रुपयांच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी अभाविपने केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही आजच्या निर्देशांकाप्रमाणे भत्त्यात वाढ द्यावी. सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना आणून शिष्यवृत्ती प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत.

- अनिकेत ओव्हाळ, कोकण प्रदेश मंत्री, अभाविप

पुढील बातमी
इतर बातम्या