विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ अद्याप सुरूच

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठाचे जाहीर न झालेले काही निकाल आणि त्यातच वारंवार वेळापत्रकात होणारे बदल, यामुळे परीक्षा विभागाचा वेळापत्रक आणि निकाल गोंधळ काही केल्या थांबताना दिसत नाही.

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी आणखी दोन निकाल जाहीर झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या लॉ शाखेच्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

निकालच जाहीर नाही आणि...

जानेवारी महिन्यात झालेल्या लॉ च्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नसतानाच काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडून पुढील सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. दरम्यान आधीच्या सत्र परीक्षेचा निकाल जाहीर न करताच पुढील परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत होता. त्यामुळे विद्यापीठाने जाहीर केलेली ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणीही जवळपास सर्व विद्यार्थी संघटनांनी केली होती.

लॉ शाखेच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विद्यार्थी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, विद्यापीठाने जाहीर केलेल्या लॉ शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्यात जवळपास १२ परीक्षांचा समावेश आहे. दरम्यान यातील काही परीक्षा याआठवडाभर पुढे ढकलण्यात आल्या असून काही परीक्षा जवळपास महिनाभर पुढे ढकलल्या आहेत.

लॉ च्या काही परीक्षांचा निकाल उशिरा लागला तर काही निकाल अद्याप जाहीर झालेले नसल्याने अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेने यांनी अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी लॉ च्या परीक्षा पुढे ढकलव्या,अशी मागणी केली होती.दरम्यानया पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असूनयातील काही परीक्षा ३० मे रोजी होणार आहेत.सदर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीरकरण्यात आले  आहे.

- विनोद माळाळे, उपकुलसचिव, जनसंपर्क परीक्षा विभाग

पुढील बातमी
इतर बातम्या