JEE मेन्स परीक्षेसाठी ७५ टक्के गुणांची अट रद्द

JEE मेन्स परीक्षेसाठी १२ वीला ७५ टक्के गुणांची अट २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मागील महिन्यात याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता JEE मेन्स परीक्षेसाठी १२ वी परीक्षेत कमीत कमी ७५ टक्के गुणांची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मागील महिन्यात केलेल्या घोषणेनुसार २०२१ पासून JEE मेन्स परीक्षा वर्षातून ४ वेळा घेतली जाणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात आयोजित केली जाणार आहे. JEE मेन्स परीक्षेचं पहिलं सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. JEE मेन्स परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांना NIT, IIT, SPA आणि CFIT सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. 


हेही वाचा -

आस्थापना पाठोपाठ सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर


पुढील बातमी
इतर बातम्या