पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा पुन्हा सुरू होणार

आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षाच न घेण्याच्या निर्णयात आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार पुढच्या वर्षापासून पाचवीच्या विद्यार्थ्यांची 50 गुणांची, तर आठवीच्या विद्यार्थ्यांची 60 गुणांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. आठवीपर्यंत परीक्षाच घेतली जात नसल्यानं विद्यार्थी अभ्यासच करत नव्हते. त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा नवा नियम करण्यात आल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण यापुढंही कायम राहणाराय. नापास झालेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी अधिक लक्ष द्यावं आणि फेरपरीक्षा घेऊन त्यांची गुणवत्ता वाढवावी, अशी सरकारची भूमिका आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा होणार आहे.  भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जूनच्या दुस-या आठवड्यात घेतली जाईल. पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुसार समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाईल.

तर, सहावी ते आठवी प्रवेशासाठी पाचवीची परीक्षा पास होणं आवश्यक असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या नव्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोवळ्या वयातल्या मुलांवर परीक्षेचं ओझं नको म्हणून आधी सरसकट पास करण्याचं धोरण राबवण्यात आलं. मात्र, आता विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडू लागल्यानं पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. या सगळ्यात शिक्षकांची आणि पालकांची जबाबदारी वाढणाराय.


हेही वाचा

ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क विद्यापीठ भरणार: चंद्रकांत पाटील

पुढील बातमी
इतर बातम्या