मुंबईतील महाविद्यालये बुधवारपासून होणार सुरू

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या रुग्ण्यांच्या संख्येत दिवसेदिवस घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक निर्बंध शिथिल करत आहे. त्यानुसार, येत्या बुधवार, २० ऑक्टोबरपासून मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासंदर्भात मुंबई विद्यापीठानं परिपत्रक काढलं असून संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांना बुधवारपासून नियमित वर्ग सुरू करण्यास सांगितलं आहे.

शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयांची दारे उघडण्यास राज्य सरकारनं परवानगी दिल्यानं गेली दीड वर्ष ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारनं दिलेल्या निर्णयानुसार त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून महानगरपालिकांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाना घ्यायचा आहे.

सध्या मुंबईतील संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आल्यानं बुधवारपासून महाविद्यालये सुरू करण्यास मुंबई महापालिकेनं परवानगी दिलेली आहे. त्यानुसार विद्यापीठानंही महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली असून, स्थानिक पातळीवरील कोरोनास्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण याबाबत स्थानिक प्राधिकरणांनी महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या