महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

राज्यामध्ये योग्य ती काळजी घेत टप्प्याटप्यानं शाळा सुरू होत आहेत. ९वी ते १२वीचे वर्ग नियमित सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागानं ५वी ते ८वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडूनही महाविद्यालयं सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा निर्णय महिनाअखेरपर्यंत होण्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शाळा व कॉलेज आता सुरू करण्याची सर्व स्तरावरून केली जात आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी विज्ञान, अभियांत्रिकी शाखांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक शिक्षण महत्त्वाचं असतं. तसंच, पीएचडी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनाही ऑफलाइन मार्गदर्शन, सर्वेक्षण, निरिक्षण करणं आवश्यक असत. याचा विचार करून राज्यातील महाविद्यालयंही टप्प्याटप्यानं सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

५० टक्के उपस्थितीत महाविद्यालयं सुरू करणं, घ्यावयाची काळजी यासंदर्भात अभ्यास केला असून, महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भातील प्रस्तावावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळं प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यावर त्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचे लाभ देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही असेही सामंत यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या