दहावीसाठी सामान्य गणित नकोच

आकडेमोडीची विशेषत्वाने आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळत असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांचा गणित हा नावडता विषय असतो. 

विद्यार्थ्यांच्या गणितातील घसरगुंडीचा परिणाम थेट निकालावर होत असल्याने अनेक शाळांनी सामान्य गणिताला महत्व दिलं. मात्र हाच विषय आता विद्यार्थ्यांच्या करियरच्या आड येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सामान्य गणित हा विषयच बाद करण्याचा निर्णय घेतलाय.

ज्या विद्यार्थ्यांना भूमिती आणि बीजगणित अवघड जात होते. अशा नववी किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा सामान्य गणित हा विषय देत असत. परंतु सामान्य गणित घेऊन दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये गणित हा विषय निवडता येत नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होतं. हे नुकसान लक्षात घेऊन हा विषय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीला सामान्य गणित हा विषय निवडणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची बैठक घेऊन शाळांनी त्यांना पुढे भेडसावणाऱ्या अडचणी सांगणं अपेक्षित होतं. परंतु शाळा तसं करत नसल्याने अकरावी प्रवेशाच्या वेळेस विद्यार्थ्यांना वाणिज्य किंवा विज्ञान शाखांमध्ये गणित हा विषय निवडण्यास अडचणी येत होत्या, असं शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले.

आता नवीन अभ्यासक्रमात गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन पाठ्यपुस्तकांमध्ये सामान्य गणितासह बीजगणित आणि भूमिती या दोन्ही विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या