अकरावीचे राहिलेले प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर

अकरावीच्या ३ नियमित आणि २ विशेष फेऱ्यांचे आयोजन शिक्षण विभागानं केले होते. त्यातील दुसऱ्या विशेष फेरीत मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळं अकरावीच्या नियमित आणि विशेष फेऱ्यांनंतरही प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहेत.

५ प्रवेश फेऱ्या होऊनही मुंबई आणि महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी अर्ज भरलेले जवळपास १० हजार विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. त्यात महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या, प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची भर पडणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची अजून एक संधी मिळणार आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन केंद्रीय फेरी घेण्याऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी याबाबत समाजमाध्यमांवर माहिती दिली आहे. दुसरी विशेष फेरी संपल्यानंतर या फेरीचे तपशील जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, या फेरीत हव्या त्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे गुणवत्तेपेक्षा तांत्रिक सक्षमता असणे अधिक गरजेचे ठरणार आहे.

यंदा प्रवेश प्रक्रिया लांबू नये यासाठी प्रवेश फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली होती. गेल्यावर्षी जवळपास ९ प्रवेश फेऱ्या झाल्या. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात आले. यंदा नियमित आणि विशेष फेऱ्या मिळून ५ फेऱ्याच घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. शासनाच्या यापूर्वीच्या पत्रकानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी घेण्यात येणार नव्हती. मात्र, आता ही फेरी होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या