पालिका शाळांमध्ये नियम डावलून नियुक्त्या

  • शेखर साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुंबई - महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये आरक्षणाचे नियम डावलून नियुक्त्या झाल्या आहेत, असा आरोप भाजपाने शिक्षण समितीत केला. अशाप्रकारच्या नियुक्तांमुळे सरकारच्या परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे अशक्य़ झाले आहे. यामुळे नियुक्ती करणारे अधिकारी आणि संबंधित शाळा यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भाजपाने केली आहे.

महापालिकेने 1995 नंतर सातत्याने परिपत्रके काढून राखीव जागा भराव्यात अशी सूचना केली होती. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना कधीच पाळल्या नाहीत. आरक्षित पदे भरण्यात आलेली नाहीत. उमेदवार उपलब्ध असतानाही राखीव असलेल्या जागेवर अन्य प्रवर्गाचे उमेदवार नेमून घटनात्मक तरतुदीचा मनपा शिक्षण विभागाने भंग केलाय, असा आरोप भाजपाचे शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दरा़डे यांनी केला. राज्य सरकारनेही अशा शाळांचं अनुदान थांबवण्यासाठी परिपत्रके काढली आहेत. या दोन्हीही तरतूदी डावलून पालिका शिक्षण विभागानं मनमानी कारभार केला आहे, असंही दरा़डे यांनी म्हटले.

2005 नंतर आणि त्यापूर्वीही आरक्षण डावलून नियुक्त्य़ा करणारे अधिकारी आणि संबंधित संस्था यांच्यावर निय़मानुसार कारवाई करावी, अशी मागणी दराडे यांनी समितीच्या बैठकीत केली. शिक्षण समिती अध्यक्षांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या