आरटीईच्या पहिल्या सोडतीत ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेश

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • शिक्षण

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित आणि वंचित घटकातील मुलांसाठी खासगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई शिक्षण विभागाने मंगळवारी प्रवेशाची पहिली लॉटरी जाहीर केली. पहिल्या सोडतीमध्ये मुंबई विभागातून ३,२३९ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

८,३४१ जागांसाठी १०,५०५ अर्ज दाखल

मुंबई विभागात पूर्व प्राथमिकसाठी ३४७ शाळांमधील ८,३४१ जागांसाठी १०,५०५ अर्ज दाखल झाले आहेत. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ६,५०८ जागांसाठी ४७११ अर्ज दाखल झाले आहेत. या प्रवेशाची पहिली सोडत मंगळवारी काढण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी २,१५१ तर, पूर्व प्राथमिकसाठी १,०८८ विद्यार्थ्यांना विविध शाळांत प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी १४ ते २४ मार्च या कालावधीत संबंधित शाळेमध्ये जाऊन प्रवेश निश्चिती करायची आहे, असे पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितलं. जे पालक या जागांवर प्रवेश घेणार नाहीत त्यांचे अर्ज बाद ठरणार असून ते प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. या प्रवेश फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या जागांची नोंद पुन्हा वेबसाइटरवर करण्यात येईल. त्यानंतर दुसरी सोडत २८ ते ३१ मार्च या कालावधीत काढली जाईल.

यंदाही राज्यात राखीव कोट्यातील हजारो जागा रिकाम्या राहण्याची शक्यता शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंच आणि मागासवर्गीय पालक-विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या